
जळगाव मिरर | १९ एप्रिल २०२५
शहरातील ट्रान्सपोर्टनगर येथे खोली घेऊन राहत असलेल्या तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा तरूण केमीकल कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला होता.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथील रहिवासी मयूर उर्फ जयंत संजय पाटील (वय २८ रा. आमोदा ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयूर पाटील यांच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. ते एमआयडीसीमधील गीतांजली केमिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. दरम्यान गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ते त्यांच्या मित्रांशी फोनवर बोलत होते. त्यानंतर मात्र मित्रांशी त्यांचा संपर्क आला नाही. एका मित्राला शंका आली म्हणून त्याने मयूर पाटील यांच्या खोलीवर जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मयूर पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.




















