मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३९ आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकारही स्थापन केले आहे. या सर्व घडामोडीवरून शिवसेना विशेष म्हणजे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. आणि अशातच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे मागणी एक दोन दिवसांमध्ये विधीमंडळात मोठे बदल बघायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत केलेल्या बंडाळीचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनादेखील आपला उमेदवार उभा केला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित झाले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जर ही निवडणूक अटीतटीची झाली तर शिवसेना शिंदे सरकारला दणका देणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपकडूनही तगडा उमेदवार देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत शिवसेनेचेच एकेकाळचे खंदे नेते आणि आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळच्या असलेल्या राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. कालच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळणार आहे.





















