
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एमएसईडीसीएल सहाय्यक अभियंत्याच्या गळ्यातून १ लाख ९० हजार रुपयांचे २७ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने जबरीने ओढून नेले. त्या महिलेने चोरट्याचा शिवाजीनगर उड्डाणपुलापर्यंत पाठलाग केला, मात्र तो चोरटा पसार झाला. ही घटना दि. २० रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास खडके चाळ जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगरातील आरशीवाला अपार्टमेंटमध्ये रत्ना किरण पाटील (वय ४३) या वास्तव्यास असून त्या एमएसईडीसीएल येथे सहाय्यक अभियंता पदावर नोकरीस आहे. दि. २० रोजी पावणेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी सुरत रेल्वे गेटजवळील साईबाबा मंदिरापर्यंत गेल्या. तेथून घराकडे परत येत असतांना खडकेचाळजवळील हनुमान मंदिरासमोरुन जात होत्या. यावेळी सुरत रेल्वेगेटकडून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने रत्ना पाटील यांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओढून तो पळून जावू लागला. सहाय्यक अभियंता असलेल्या रत्ना पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र तो पर्यंत चोरटा शिवाजी नगर उड्डाणुलाच्या दिशेने पळून जात होता. दरम्यान, रत्ना पाटील यांनी दुसऱ्या वाहनावरुन त्या चोरट्याचा पाठलगा केला. मात्र तो चोरटा तेथून सुसाट वेगाने पळून गेला.गळ्यातील मंगळसूत्र ओढल्यामुळे रत्ना पाटील यांच्या गळ्याला ओरबडले गेले आहे. चोरट्याने सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा २७ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















