
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२५
राज्याच्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खानदेशातील शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जात आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.
गुलाबराव पाटील यांनी बुधवारी अक्षय्य तृतीया निमित्त राज्यभरातील जनतेला अहिराणी भाषेत गण म्हणत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राजकीय फटकेबाजी करत खानदेशातील आजी माजी मंत्र्यांना चिमटे काढले, तसेच अनेक नेत्यांच्य अजित पवार गटातील प्रवेशावरून जोरदार टोलेबाजी केली.
प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जात आहेत? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मजूर फेडरेशन मधील घोटाळा, जिल्हा बँकेतून पाच कोटींचे घेतलेले कर्ज प्रकरण यामुळे ते अडचणीत आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली आहे, त्यामुळे ते अडचणीत आहेत. त्यांनी जी घाण केली आहे, ती साफ करण्यासाठी ते जात असल्याचा दावाही पाटील यांनी केला.
अजितदादा छाती ठोक पाने म्हणतात की माणसे तपासून घेईल. त्या देवकर यांच्यासारखे फार सुंदर माणसे त्यांनी तपासून घेतले आहे, असा घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. अजितदादांना पुढच्या काळात लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. गुलाबराव देवकर यांनी आपण घोटाळा केला नसल्याचे म्हणाले होते. त्यावर सहा महिने का तोंड बंद होते? एकनाथ शिंदे यांना भेटायचे वेळी कुठे झोपलेले होते? असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला. माझ्याबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवकर यांचे बैठक झाली, असा मोठा खुलासाही मंत्री पाटील यांनी यावेळी केला.




















