
जळगाव मिरर | ३ मे २०२५
अमळनेर तालुक्यातील खवशी येथे दि.३० रोजी मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या शिक्षकाच्या घरातील कपाटच लांबवून त्याच्यातील २ लाख ७३ हजार रुपये व शेजारील घरातील ७ हजार रुपये अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, खवशी येथील शिक्षक सिद्धार्थ वसंत शिरसाठ यांना त्यांच्या शेजारील सिद्धार्थ अशोक शिरसाठ यांचा १ रोजी पहाटे साडेचार वाजता फोन आला की मी बाहेर झोपलेलो आहे. मला पाणी प्यायचे होते म्हणून घरात जाण्यासाठी दरवाजा उघडायला गेलो तर दरवाजा आतून बंद आहे. त्यामुळे हे दोघे जण त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस गेले.
त्यावेळी त्यांना दोघांच्या घराचे मागचे दरवाजे उघडे दिसले. तर सिद्धार्थ शिरसाठ यांच्या घरातील लोखंडी कपाटच गायब दिसले. या कपाटात १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४५ हजाराचे १५ ग्रॅमचे दोन सोन्याचे टोंगल, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे दोन सोन्याचे काप, १५ हजाराची सोन्याची पोत, १२ हजाराची चार ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ हजाराच्या सोन्याच्या कानातील बाह्या, ३ हजाराची सोन्याची नथ असा एकूण २ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, या दोघांनी कपाट शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते कपाट गणेश वसंत कापडे यांच्या शेतात उघडे पडलेले दिसले. तर कपाटातील ऐवज गायब होता. यात सिद्धार्थ शिरसाठ यांचेही सात हजार रुपये चोरीस गेले आहेत. याबाबत सिद्धार्थ शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, हे.कॉ. संदेश पाटील, हे. कॉ. सुनील जाधव यांनी भेट दिली. तर जळगावहून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि डीवायएसपी कार्यालयातील फॉरेन्सिक प्रयोगशाळा कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते.




















