
जळगाव मिरर | ३ मे २०२५
राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणे चव्हाट्यावर येत असतांना आता 17 एप्रिलला कोयत्या गँगने एका जणावर हल्ला चढवला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. या गँगवर कारवाई करावी अशी मागणी मी अधिवेशनात केली होती पण अशी गँग नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आता याकडे गृहमंत्री-पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केले. कोर्टाने भिसे व पवार या सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
रोहित पवारांचे ट्विट काय?
रोहित पवार म्हणाले की, पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते, आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करु शकतात. घटनेमागचे नेमके कारण काय होते, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का, हे शोधले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी सुरु आहे आणि एकाने हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणावर तो उगारला आहे.




















