
जळगाव मिरर | ३ मे २०२५
राज्यातील गोंदियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंघोळीसाठी कालव्यावर गेलेल्या 2 मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील गोर्रे गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोंदियामध्ये कालव्यात आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. प्रशांत पटले (21) आणि प्रतीक बिसेन (21) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. प्रशांत आणि प्रतीक हे दोघे मित्र कालव्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरु केले. अथक प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह घटनास्थळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर सापडले. दोन तरुण मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली. या दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.





















