
जळगाव मिरर | १५ मे २०२५
राज्यभरात सध्या लग्नाचा धडाका सुरु असतांना एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. डोक्यावर अक्षता पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे नवरीच्या माहेर व सासर या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, माळशिरसच्या बाभूळगाव येथील समीर पराडे नामक तरुणाचे गत 13 मे रोजी घोटी येथील जानकी गळगुंडे हिच्याशी लग्न झाले. नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात हजारो उपस्थितांनी या दोघांवर आशीर्वादरुपी अक्षता टाकल्या. त्यानंतर नवी नवरी सासर घरी आली. पण दुसऱ्याच दिवशी अचानक तिच्या छातीत कळा येऊ लागल्या. त्यानंतर तिला तत्काळ अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात येत होते. पण रस्त्यातच लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नव्या नवरीने इहलोकीचा निरोप घेतला. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी हे अघटित घडल्यामुळे पराडे व गळगुंडे कुटुंबाने एकच टाहो फोडला. मृत जानकीवर बाभूळगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




















