
जळगाव मिरर | १७ मे २०२५
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युती होण्याचे संकेत दिले आहेत. आमचे राजकारण सेटिंगचे नाही. स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत आहोत. आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिल्याने आता याबाबतच्या घडामोडींना काहीशी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण, आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. सेटिंगचं राजकारण करणार नाही, आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाबाबतही महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, या पुस्तकाचे अनावरण होऊ द्या, मी अद्याप पुस्तक वाचले नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी जेलमध्ये काळ काढला. जे जेलच्या भीतीने पळाले ते सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. भाजपने आमचा पक्ष फोडला, ही नीच प्रवृतीआहे. हे घाणेरडे राजकारण भाजप करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली.
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी देण्यासाठी यांनी वचन दिले होते. निवडणुकीपूर्वीचे वचन पूर्ण करत नसून सरकारमधील तिघांमध्ये भांडण लागले आहे. ही भांडणे एकमेकांच्या हिताची असून कोणाला बंगला हवाय तर कुणाला पालकमंत्री पद हवय. महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षातून कोणी बोलत नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.




















