
जळगाव मिरर | ३ जून २०२५
चाळीसगाव तालुक्यात चारित्र्याचा संशय घेवून दोरीने पत्नीचा गळा आवळून खून करत पतीने ही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे २ रोजी सकाळी ९.३० ते ११.४५ वाजेदरम्यान विजय सुकदेव चव्हाण यांच्या शेतात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत पतीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील विजय सुकदेव चव्हाणके हा पत्नी वर्षा (वय ४०) व मुले तसेच आई यांच्यासह हातगाव शिवारात राहत होता. दरम्यान, गेल्या २ वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे विजय चव्हाणके यांचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे त्यांचे आणि पत्नीचे कौटुंबीक कारणातून वाद होत असत. यातून तो पत्नी वर्षा यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे. दरम्यान, २ रोजी सकाळी ११.२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून मी पत्नी वर्षाला संपवले असून मी ही बरेवाईट करणार असल्याचे त्यांना सांगितले.
या भेदरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतामध्ये असलेल्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर त्याची पत्नी वर्षा शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहूलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहूल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली होती. घटनेचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. या घटनेने हातगाव परिसरात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.
लहान भाऊ विजय चव्हाणके याने त्याची पत्नी वर्षा चव्हाण यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला, तर विजय याने स्वतः ही शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा आशयाची फिर्याद विजयचे मोठे बंधू अशोक चव्हाणके यांनी दिली आहे. त्यावरून मयत विजय चव्हाणके याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. राहूलकूमार पवार घटनेचा तपास करत आहेत.




















