जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कालच विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. मात्र काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे मंत्रिपदाची आस असलेल्या एकनाथ खडसेंचं स्वप्न धुळीला मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यातच भाजपचे संकटमोचक नेते आणि खडसेंचे राजकीय वैरी गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे. मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला, अशी खडसेंची अवस्था झाल्याचं महाजन म्हणाले.
“एकनाथ खडसे आमदार झाले, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना वाटलं होतं, की आपण मंत्री होऊ, खूप चांगलं काम करु, पण राजकारणात सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात. ते आमदारपदी आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं, त्यामुळे त्यांना आमदारकीवरच समाधान मानावं लागणार आहे” असं महाजन म्हणाले.
“पंगतीत बसले आणि बुंदी संपली, असं खडसेंविषयी लिहिल्याचं मी सोशल मीडियावर ऐकलंय. त्याहून पुढे जाऊन, मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर येऊन पाहिलं, तर चप्पल चोरीला, अशी अवस्था एकनाथ खडसेंची झाली आहे, पण हा योगायोग आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी लिहिल्या जातात. पण हे त्यांच्यामुळे झालं किंवा अपशकुन झाला, असं मी म्हणणार नाही” असा टोला महाजनांनी लगावला.




















