जळगाव मिरर | ८ जुलै २०२५
बहिणीच्या अकरावीच्या प्रवेशाकरीता भाऊ महाविद्यालयात गेलेला असतांना, खूशी चैत्राम जाधव (वय १७, रा. रामेश्वर कॉलनी) या बहिणीने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजून गेली असून मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत खुशी जाधव ही तरुणी कुटुंबियांसह वास्तव्यास होती. दहावीची परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर खुशीला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता. त्या करीता सोमवारी सकाळी तिचा भाऊ मयूर जाधव तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात गेला होता. तर आई वडील हे कामाला गेलेले होते, त्यामुळे घरात कोणीही नव्हते. मयूर घरी परतल्यानंतर त्याला खुशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हा धक्कादायक प्रकार पाहून त्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने शेजारी धावून आले आणि त्यांनी तात्काळ खुशीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
खुशीची आई रंजनाबाई या शहरातील एका रुग्णालयात कामाला आहेत, तर वडील चैत्राम जाधव एमआयडीसीमधील एका कंपनीत कार्यरत आहेत. खुशीचा भाऊ मयूरदेखील एका कंपनीत कामाला आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, ज्यावेळी तिच्या अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होती, त्याचवेळी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खुशीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत
