जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
राज्यातील पावसाळी अधिवेशनाचा आठवड्याचा पहिलाच दिवस 14 जुलै 2025 वादळी ठरला, जेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर ‘चड्डी बनियन गँग’ अशी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर युतीधर्मामुळे कारवाई न करण्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी ठाकरेंना थेट नाव घेण्याचे आव्हान दिले, ज्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला.
राज्यातील विविध प्रश्नांवर भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “युतीधर्म पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत, ती ‘चड्डी बनियन गँग’ कुणालाही मारहाण करते, काहीही करते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही.” यामागे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा संदर्भ होता. ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांचे मी कौतुक करतो की त्यांनी मोठी सहनशीलता दाखवली. पण राज्यात आणि मुंबईत जे सुरू आहे, त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या ‘चड्डी बनियन गँग’वर कठोर कारवाई करून शासन काय असते हे दाखवून द्यावे.”
आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे संतप्त झाले. ते म्हणाले, “ठाकरेंनी ‘चड्डी बनियन गँग’ असे शब्द वापरले, पण नेमके कोणावर कारवाई व्हावी हे त्यांनी स्पष्ट करावे. चड्डी कोण आणि बनियन कोण, हे सांगावे. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल, तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. हिंमत असेल तर कोणासाठी हे बोलले ते स्पष्ट करावे, नाहीतर हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत.” राणे यांनी ठाकरेंना थेट आव्हान देत सभागृहात तीव्र शाब्दिक चकमक घडवून आणली.