जळगाव मिरर | १५ जुलै २०२५
एरंडोल येथील रहिवासी पुरुषोत्तम भांडारकर हे पारोळा येथील कासार गल्लीमध्ये पापड विक्री करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल येथील पांडव वाडा, गाढव गल्लीतील रहिवासी पुरुषोत्तम रामकृष्ण भांडारकर (वय ५५) हे गेल्या १५ ते २० वर्षापासून पारोळा शहरात पापड विक्रीचा व्यवसाय करत असल्यामुळे प्रचलित होते. दरम्यान, सायकलवरून ते पापड विक्री करत असत. तर गेल्या वर्षभरापासून ते दुचाकीने शहरात रोज पापड विक्री करून आपला प्रपंच चालवत होते. दरम्यान, १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पुरुषोत्तम भांडारकर हे पापड विक्री करत असताना कासार गल्लीत त्यांची अचानक प्रकृती खालवली अन् ते जमिनीवर पडले. त्या वेळी त्यांना लगेच कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
