
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कानळदा रोडवरील हरीओमनगरात राहणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या तरुणाला कुटुंबातून लग्नास विरोध झाला. यातून त्याने मुलीचे इतरत्र लग्न होऊ नये म्हणून मानसिक त्रास दिला. व्हिडीओ काॅलवर दरडावत असतानाच त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने व्हिडीओ काॅल सुरु असतानाच त्याच्यासमोरच गळफास घेतला. या मुलीचा 19 दिवसांनी उपचारादरम्यान आज दुपारी 12 वाजता मृत्यू झाला.
दिव्या दिलीप जाधव (वय 21, रा. हरीओमनगर, कानळदा रोड) असे मृत मुलीचे नाव आहे. तर नीलेश मंगलसिंग गायकवाड (रा. तारखेडा, ता. पाचोरा) असे मुलाचे नाव आहे. त्याच्यासह त्याची आई लक्ष्मीबाई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
नीलेश व दिव्या दोघेही एकाच समाजातील होते. दोन वर्षांपासून उभयंतात प्रेमसंबध होते. नीलेशने दिव्याला लग्नाचे आमिष दिले होते. परंतु, लग्नाबाबत विचारले असता तो स्पष्टपणे उत्तर देत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी दिव्याच्या कुटुंबियांनी समाजातील काही लोकांसह नीलेशच्या घरी जाऊन बोलणी केली. यावेळी नीलेशची आई लक्ष्मीबाई यांनी अपमानास्पद वागणुक दिली. आर्थिक स्थितीवरून तुलना करीत बरोबरी करु शकणार नाही आणि हुंडा देऊ शकणार नाहीत असे वक्तव्य केले होते.
नीलेशहा सातत्याने दिव्याशी संपर्क करुन मानिसक त्रास देत होता. तिच्यासाठी दुसरे स्थळ येत असल्याचे समजताच त्याने फाेटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे 24 जून रोजी व्हिडीओ कॉलवर तो धमकावत असताना त्याच्यासमोर दिव्याने गळफास घेतला. अत्यवस्थ झाल्यामुळे तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते.
19 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर बुधवारी दुपारी १२ वाजता दिव्याची प्राणज्योत मालवली. यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश व संताप व्यक्त केला. नीलेश व लक्ष्मीबाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.




















