जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गाव पुन्हा एकदा तणावाच्या सावटाखाली सापडले आहे. शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर आलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गावात वातावरण चिघळले. काही तासांतच दोन गट आमने-सामने आले, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थितीवर नियंत्रण मिळवलं, मात्र गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे.
ही सगळी घटना एका तरुणाच्या वादग्रस्त व्हॉट्सॲप स्टेटसने सुरू झाली. त्याने शुक्रवारी सकाळी एक जातीय आक्षेपार्ह मजकूर शेअर केला. या स्टेटसची माहिती गावात पसरताच तणाव वाढू लागला. दुपारी १२ च्या सुमारास यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. काही ठिकाणी जमावाने दुचाकी पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच एक धार्मिक स्थळही लक्ष्य बनल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. यवतमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलिसांना योग्य ते निर्देश दिले.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. “काही काचफोड व तोडफोड झाली असली, तरी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू आहे,” असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही घटना केवळ एका पोस्टपुरती मर्यादित राहिलेली नसून, मागील काही दिवसांतील तणावाची परिणती असल्याचं सांगण्यात येत आहे. २६ जुलै रोजी नीळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कथित अवमान झाल्याची घटना घडल्यानंतर गावात आधीच तणाव निर्माण झाला होता.
त्याच पार्श्वभूमीवर काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात यवत येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतर गावात तणाव अधिक वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी सांगितले की, “मागील काही दिवसांपासून यवतमध्ये तणाव होताच. संवादाच्या माध्यमातून तो निवळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
