जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असून, रेल्वे बोर्डाने या सेवेवर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीला महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाडीच्या सुरूवासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
पुणे-नागपूर किंवा मुंबई-नागपूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची प्रवाशांची दीर्घकालीन मागणी होती. यासंदर्भात रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली तसेच पत्रव्यवहाराद्वारेही सातत्याने मागणी लावून धरली. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, लवकरच पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत धावणार आहे.
सध्या पुणे-नागपूर मार्गावरील सर्वात जलद गाडी हावडा-दुरांतो एक्स्प्रेस आहे, जी हा प्रवास सुमारे १२ तास ५५ मिनिटांत पूर्ण करते. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस यापेक्षा जलद म्हणजेच केवळ १२ तासांत पुणे ते नागपूरचे अंतर कापणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसचे संभाव्य वेळापत्रक पुणे अजनी : सकाळी ६:२० ला सुटणार, सायंकाळी ६:२० ला पोहोचणार. अजनी पुणे : सकाळी ९:२० ला सुटणार, रात्री ९:३० ला पुण्याला पोहोचणार. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्टेशनवर थांबे असणार आहेत. या नवीन वंदे भारत सेवेचा प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, पुणे व नागपूर या दोन प्रमुख शहरांमधील संपर्क अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.
