मुबई : वृत्तसंस्था
ब्लु डार्ट एक्सप्रेसच्या जोगेश्वरी येथील कार्यालयात मंगळवारी रात्री जोरदार स्फोट झाला आणि एका पार्सल बॉक्सला आग लागली. या ठिकाणी असलेल्या कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. आग विझल्यानंतर बॉक्स खोलून पाहताच आतमध्ये दिवाळीचे दिवाळीच्या फुलबाजे, पाऊस, फटाके तसेच एक मोबाइल फोन आणि बॅटरीजच्या सहाय्याने तयार केले एक इलेक्ट्रीक सर्कीटअर्धवट जळालेल्या स्थितीत आढळले.
कुरियर कंपनीच्या वतीने याबाबत त्वरित जोगेश्वरी पोलिसांना कळविण्यात आले. जोगेश्वरी पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून याप्रकरणात गुन्हा दाखल केला. फटाक्यांच्या साहाय्याने बॉम्ब तयार करून टायमरने स्फोट घडवून आणल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि या पार्सलबाबत कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सांताक्रूझच्या हनुमान टेकडी परिसरातील एका तरुणाने हे पार्सल दिल्लीमध्ये आईला पाठविण्यासाठी दिले असल्याची माहिती मिळाली.
जोगेश्वरी पोलिसांनी हनुमान टेकडीचा परिसर पिंजून काढत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने आपण बॉम्ब तयार केल्याचे मान्य केले. काही दिवसांपूर्वी या मुलाने एका बँकेची विमासबंधी जाहिरात पाहीली होती. या जाहीरातीमध्ये एखादी वस्तू, साहीत्य प्रवासादरम्यान हाताळताना तुटले अथवा त्याचे नुकसान झाल्यास सदर ‘शिपमेंट व ट्रांझीट’ पॉलीसीच्या माध्यमातुन नुकसान भरपाई दिली जाते.
या माहितीवरून पैसे कमविण्याच्या उद्देशाने दोन कॉम्प्युटर प्रोसेसर, मोबाईल, मेमरी खरेदीची बनावट ९ लाख ८१ हजारांची एका वेबसाईटद्वारे बनावट पावती बनवली आणि त्याआधारे या मुलाने या वस्तूंचा आय.सी.आय.सी.आय. (लोमबार्ड) या इन्सुरन्स कंपनीकडुन ऑनलाइन विमा उतरविला. हे पैसे मिळण्यासाठीच त्याने हा खटाटोप केला.
युट्यूबवरून घेतले धडे
फटाक्यांपासून बॉम्ब कसा तयार करायचा याचे धडे युट्युबवरून घेतल्याचे या मुलाने चौकशीत सांगितले. त्यात दाखविल्याप्रमाणे वस्तू खरेदी केल्याचे तो म्हणाला. न्यायालयाने या मुलाची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली आहे.




















