
जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
शहरातील रामानंद नगरचा घाट चढण्याकरीता टाईल्स वाहतुक करणाऱ्या मिनी टेम्पो भरधाव वेगाने जात होता. या टेम्पोने समोरुन येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक देत तो एका दुकानात शिरला. या विचित्र अपघातात घरी परतणारे दुचाकीस्वार स्वप्निल अशोक कापूरे (वय ४०, रा. नवजीवन कॉलनी, वाघनगर) हे गंभीर जखमी होवून त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगरच्या घाटात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील नवजीवन कॉलनीत स्वप्निल कापूरे हे वास्तव्यास असून ते एका कंपनीत नोकरीस होते. तर त्यांची पत्नी या एरंडोल येथील भूमीअभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. कापुरे हे सायंकाळच्या सुमारास गावातून (एमएच १९, ईक्यू ४२१३) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होते. तर बांधकामाच्या टाईल्स घेवून जात असलेला विनाक्रमांकाचा मिनी टेम्पो रामानंद घाट चढण्याकरीता भरधाव वेगाने जात होते. रामानंद घाटाच्या वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोसमोर दुचाकी आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यानंतर टेम्पो हा रस्त्याच्या कडेला असलेल्या शांती फर्निचरच्या दुकानात शिरला.
मीनी टेम्पो चालकाने दुचाकीस्वारांना चिरडल्याने स्वप्निल कापुरे यांची दुचाकी टेम्पोच्या खाली अडकल्यामुळे कापुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्यासोबत इतर दोन जणांना देखील गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. यावेळी गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल कापुरे यांचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत करताच, त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी टेम्पोने समोरुन येणाऱ्या वाहनांना धडक दिली. या अपघातात स्वप्निल कापुरे यांचा मृत्यू झाला, तर अन्य एकाची प्रकृती अस्वस्थ असून अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपाचार सुरु आहे.




















