जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) वन आणि वन्यजीव विभागात फॉरेस्ट गार्ड पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून, अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत DSSSB च्या अधिकृत संकेतस्थळावर https://dsssb.delhi.gov.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या भरतीअंतर्गत एकूण ५२ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यात १९ पदे सामान्य प्रवर्गासाठी, १८ ओबीसी, ६ अनुसूचित जाती, ५ अनुसूचित जमाती आणि ४ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा व त्याचे वय १६ सप्टेंबर २०२५ रोजी १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
या पदासाठी शारीरिक पात्रता अनिवार्य असून, पुरुष उमेदवारांची उंची किमान १६३ सेमी आणि छाती ८४ सेमी (५ सेमी फुगवणे अनिवार्य) असावी. महिला उमेदवारांची उंची किमान १५० सेमी असावी. याशिवाय, पुरुषांना २५ किलोमीटर आणि महिलांना १६ किलोमीटर धाव ४ तासांत पूर्ण करावी लागेल.
सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, SC, ST, दिव्यांग व महिला उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. शुल्काचे भरणे केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून, एकूण २०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करण्यात येतील. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणितीय योग्यता, हिंदी व इंग्रजी भाषेचे प्रश्न असतील. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ अंतर्गत ₹२१,७०० पासून सुरू होणारे वेतन मिळणार असून, ते ₹६९,१०० पर्यंत जाऊ शकते. याशिवाय शासनाच्या नियमानुसार भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळतील.