
जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५
वडिलांनी रागावल्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या शहरातील शनि मंदिर वार्डातील १८ वर्षीय अक्षय नीलेश चौधरी या तरुणाने बुधवारी सकाळी तापी नदीत उडी घेतली. दरम्यान, उडी घेण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला व्हिडिओ कॉल करत ‘मी तापीत उडी घेतोय’, असे सांगून फोन बंद केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत बचाव व शोधमोहीम सुरू होती.
सविस्तर वृत्त असे कि, अक्षय चौधरी हा पायी बुधवारी सकाळी ९.३० ते ९.५० वाजेदरम्यान तापी नदीच्या पुलावर गेला होता. त्याने तेथून त्याचा कंडारी येथील मित्र विजय बोदडे याला व्हिडिओ कॉल केला. ‘घरचे टेन्शन आहे… मी तापीत उडी घेतोय’, असे म्हणत अक्षय फोनवरच रडू लागला. यानंतर त्याने फोन बंद केला. त्यानंतर पुलावर मोबाइल व चप्पल ठेवून त्याने थेट नदीत उडी मारली. दरम्यान, अक्षयचा मित्र विजय हा त्याच्या बोलण्याने चांगला घाबरून गेला. त्यानंतर तत्काळ त्याने तापी पुलाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत अक्षयने पाण्यात उडी घेतलेली होती. या घटनेनंतर पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, हतनूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीला पूर आला आहे, त्यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार युनूस शेख आणि शेखर तडवी यांनी तातडीने पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. भानखेडा व शेळगाव येथील पोलीस पाटलांनाही सतर्क करण्यात आले आहे. तापी नदी परिसरात या युवकास पाहिले असल्यास, भुसावळ शहर पोलीस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षयच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने चौधरी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. तर रात्री उशिरापर्यंत अक्षयचा काहिच थांगपत्ता लागलेला नव्हता.




















