जळगाव मिरर । २ ऑक्टोबर २०२५
राज्यातील सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी संभाजी भिडे यांनी केलेल्या भाषणाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भिडे यांनी पाकिस्तानबाबत कठोर शब्दांचा वापर करत, पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही, असे वक्तव्य केले. त्याचबरोबर, हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आज शत्रूला संपवलं पाहिजे, पण आपला शत्रू कोण आहे हेच न कळणारा समाज हा मूर्ख समाज आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
याआधीही नवरात्र उत्सव आणि सामाजिक परंपरांबाबत संभाजी भिडेंची विधाने वादग्रस्त ठरली आहेत. दुर्गामाता दौड कार्यक्रमातच त्यांनी दांडिया खेळावर आक्षेप घेत दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असे म्हणत टीका केली होती. नवरात्रीसारखा पवित्र उत्सव फालतू गोष्टींनी विकृत होत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरे करण्यामध्ये पाश्चात्य प्रभावामुळे मूळ परंपरेचा अपमान होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श मानून हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घ्यावी, अशी हाक देतानाच आजचे समाजकार्य दांडिया, फॅशन शो, पार्टीपुरते मर्यादित झाले आहे, असे म्हणत त्यांनी तरुणाईवरही अप्रत्यक्ष टीका केली होती.
संभाजी भिडेंच्या वक्तव्यांवरून त्यांनी संविधानालाही लक्ष्य केले. आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? अशा शब्दांत त्यांनी भारताच्या घटनेचा उल्लेख केला होता. इतकेच नव्हे, तर भारत हा 1300 वर्षे मुस्लिम आणि युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना गुलामीची लाज वाटत नाही, तो हा निर्लज्ज देश आहे, असे तीव्र भाष्य त्यांनी केले. संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबाबत अशा प्रकारची भूमिका घेणारे भिडे यांचे हे विधान लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घेत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, भिडे यांच्या विधानांना एकवाक्यता आणि विरोध अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यांच्या समर्थकांच्या मते, त्यांनी व्यक्त केलेला रोष हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, विरोधकांचे म्हणणे आहे की, देशाच्या लोकशाही आणि संविधानाचा अपमान करणारी भाषा वापरणे हे अयोग्य असून, समाजात असहिष्णुता पसरवणारे आहे. सांगलीतील या कार्यक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भिडे यांच्या वादग्रस्त भाषणावरून येत्या काही दिवसांत आणखी मोठा राजकीय वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.