जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उफाळून येत असताना खुनाच्या घटना सातत्याने घडत आहे. विजया दशमीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील वय-२७ रा. कासमवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील याचा त्याच्या घरासमोर होणाऱ्या कामातील काही तरुणांसोबत जुना वाद होता. शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना यातील दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच पायाच्या मांडीवर तलवार आणि कोयत्याने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील हा गंभीर जखमी झाला. या घटनेत नाना उर्फ ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु होती.