जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज भागातील लिंबेजळगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी घर-जिवळ असलेल्या एका खड्ड्याजवळ गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२) भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, इमरान इसाक शेख (वय २०), इम्मू इसाक पठाण (१०), जानू बाबू पठाण (१०) आणि गौरव दत्तू तारक (१०) अशी या मुलांची नावे आहेत. यातील तिघे मुले लिबेंजळगाव जि.प. प्रशालेत शिकत होती. गौरव हा एकुलता एक मुलगा होता. वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर-पुणे रोडवरील लिंबेजळगाव शिवारातील गट क्रंमाक १७६ मधील शेत वस्तीवर शेख कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील इमरान इसाक शेख हा गुरुवारी दुपारी दसर्यानिमित्त एक वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेंभापुरी धरणात वाहणाऱ्या खड्यातील पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याच कुटुंबातील इम्मू इसाक पठाण, जानू बाबू पठाण, आणि घराशेजारचा मुलगा गौरव दत्तू तारक हे तीन लहान मुले होती. या चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसाने पाणीतीन-चार दिवसांपूर्वी वाळूज भागात झालेल्या मुसळधार पावसात नागझरीसह इतर नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता. त्यामुळे आजही या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले पाण्यात गेली असल्याचा अंदाज यावेळी उपस्थितांनी वर्तविला. दरम्यान, मुरुमासह मातीच्या चोरटी वाहतुकीमुळे टेंभापुरी भागात मोठमोठे खड्डे पडलेले आजही दिसून येतात. त्यातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असते. नेमके पाणी किती याचा अंदाज लवकर येत नसतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यात अशा दुर्दैवी घटना घडतात.