
जळगाव मिरर । ४ ऑक्टोबर २०२५
शहरातील राधाकृष्ण नगर भागात गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बेरोजगारीच्या विवंचनेतून एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. सुरेंद्र रामसिंग चौधरी (वय ३३, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र चौधरी हा त्याच्या आईसोबत राधाकृष्ण नगरात वास्तव्यास होता. नोकरी नसल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक विवंचनेत होता. घटनेच्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी दि.२ ऑक्टोबर दसरा सण असल्याने सुरेंद्रची आई सायंकाळी ६ च्या सुमारास जवळच्या दुर्गोत्सवानिमित्त घराबाहेर गेली होती. आई घरात नसताना सुरेंद्रने ही टोकाची भूमिका घेतली. त्याने घरात उपलब्ध असलेला ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. आग लागल्याने तो आरडाओरड करत घराबाहेर रस्त्यावर पळत सुटला. हे पाहताच स्थानिक तरुणांनी तातडीने धाव घेत आग विझवली आणि त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
जळीत अवस्थेत असलेल्या सुरेंद्र चौधरी यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र गंभीर भाजल्यामुळे रात्री ११ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. बेरोजगारीच्या समस्येतून एका तरुणाने आपले जीवन संपविल्याने समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे.




















