
जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२५
प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुला पेट्रोल टाकून जाळून टाकीन, अशी धमकी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दिल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील एका गावात उघड झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पीडित अल्पवयीन मुलगी किराणा दुकानावर साहित्य घेण्यासाठी गेली असता, संशयित गिरधर विक्रम चव्हाण (२३) याने तिला माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असे सांगितले. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी ही मुलगी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता, शुभम निंबा पवार (२४) हा तिथे आला आणि “तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली. तसेच चाळीसगाव बस स्थानकावरही हे दोघे आले आणि गिरधर व शुभम यांनी पीडित मुलीचा हात पकडून तिला सांगितले, तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर तुला पेट्रोल टाकून जाळून टाकीन, अशी धमकी दिली.
हा प्रकार २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२३ या दोन महिन्यांच्या कालावधीत घडला. पीडित तरुणीने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून संशयित गिरधर विक्रम चव्हाण आणि शुभम निंबा पवार यांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















