
जळगाव मिरर । ९ ऑक्टोबर २०२५
जामनेर तालुक्यातील पहूर येथे वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेराहून वीस लाख रुपये हुंड्याच्या स्वरूपात घेऊन यावे यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. आणि गळफास देऊन विवाहितेस जीवे मारून टाकल्याची घटना जंगीपुरा ता. जामनेर येथे आज दि. ८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. भाग्यश्री राहुल परदेशी ( वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बुधवारी रात्री २ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पती राहुल परदेशीसह सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत व दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने गळफास देऊन जीवे मारून टाकल्याची फिर्याद विवाहितेची वडील सरदार बाबुलाल परदेशी (रा. पांगरा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली आहे. भाग्यश्री राजपूत हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासरच्या लोकांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. भाग्यश्री राजपूत यांच्या मृत्यूमुळे तीन वर्षाच्या यशचे मातृछत्र हरपले असून भाग्यश्रीचे भाग्य हुंडाबळीने काळवंडले असल्याच्या संतप्त भावना माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. मृत भाग्यश्री हिचे पहुर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत भाग्यश्री हिचे जंगीपुरा येथे चोख पोलीस बंदोबसतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पती राहुल राजपूत व सासू रेखा राजपूत यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनीही घटनास्थळी धाव – घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.




















