
जळगाव मिरर । १० ऑक्टोबर २०२५
पुणे येथील नीलेश घायवळ प्रकरणावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुंडगिरीमागे राजकीय वरदहस्त असल्याच्या आरोपानंतर महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत, माझ्या आईचा फोटो वापरून गलिच्छ राजकारण करू नका, माझ्या समोर या. माझ्याशी लढायची ताकद नाही म्हणून भाजप माझ्या कुटुंबाला टार्गेट करत असल्याचा आरोप केला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, माझी आई राजकारण करत नाही, ती फक्त समाजकारण करते. ती सामान्य आणि सरळ स्वभावाची महिला आहे. विरोधकांना किंवा आमच्याच कार्यकर्त्यांनाही विचारले तरी हेच सांगतील. पण भाजपवाल्यांनी तिचा फोटो वापरून राजकीय गलिच्छपणा केला आहे. म्हणजेच मला थेट सामोरे जायला भाजप घाबरत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. माझ्या आईला राजकारणाचे काहीही देणंघेणे नाही. ती समाजासाठी काम करते. इथे एखादा विरोधकसुद्धा तिच्या जवळ उभा राहिला तरी तिला त्याचे भानही येणार नाही. पण तिचा वापर करून हल्ला करणे हे अत्यंत नीच राजकारण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नीलेश घायवळ प्रकरणावरून भाजपकडून सुरू असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी थेट लढायची? माझ्यावर टीका करा, मी राजकारणात आहे. माझ्यावरील आरोपांना मी उत्तर देईन. पण माझ्या आईला मध्ये ओढून वैयक्तिक पातळीवर राजकारण केले जाते, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तुमचं जे काही काढायचे असेल ते माझ्याबद्दल काढा. मीही उत्तर देईन. पण कुटुंबाला यात आणणे म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या कमकुवत आहात याचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




















