पाचोरा : प्रतिनिधी
चुलत बहिणीच्या साखरपुड्यास पुणे येथे निघालेल्या कोटा येथील एका २५ वर्षीय तरूणीचे रेल्वे प्रवासात प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, राजस्थानमधील कोटा येथील रहिवाशी वाघिषा संजय पोतेदार (वय -२५) या २० जुलै रोजी सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेसने (क्रमांक – १२६३०) डब्बा नंबर बी – ५ सिट क्रंमाक – १ वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. दरम्यान बुऱ्हाणपूर ते भुसावळ दरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसिन घेतली. मात्र रेल्वे एक्स्प्रेसही जळगांव ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजुन ३० वाजता संपर्क क्रांती एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. वाघिषा ह्या फरिदाबाद येथे खाजगी कंपनीत नौकरीस आहे.
घटनेची माहिती पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोराचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आरपीएफ पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र वाघिषा हिची प्राणज्योत मालवली होती. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी एकच टाहो फोडला. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















