जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२५
अमळनेर शहरातील पैलाड परिसरात सोमवारी दुपारी सिनेस्टाईल घटनेत एका वृद्धाकडून ५० हजार रुपये हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला प्रसंगावधान राखत एका तरुणाने पकडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दुसरा संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैलाड येथील रहिवासी तुकाराम भोई हे सोमवारी दुपारी बडोदा बँकेतून ५० हजार रुपये काढून आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून घरी निघाले होते. घराजवळ पोहोचल्यावर भोई पैसे काढत असताना दोन अल्पवयीन मुलांनी दुचाकीवर येऊन त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भोई यांनी आरडाओरड केली असता, जवळच उपस्थित असलेले रोहित भागवत पाटील यांनी त्वरित धाव घेत एका चोरट्याला पकडले व त्याच्याकडील रक्कम परत घेतली. दुसरा संशयित चोरटा मात्र तेथून पलायन करण्यात यशस्वी झाला. पकडण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीला पोकॉ. मंगल भोई व विनोद भोई यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, तरुणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.