जळगाव मिरर । १६ ऑक्टोबर २०२५
भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरातील राहुल नगरमधील दीपक पंडित करोले (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक करोले हे आपल्या दुचाकीवरून (एमएच १९, बीडब्ल्यू – ३३३२) जळगाव नाक्याकडे जात असताना जळगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (एमपी ६८, झेडडी- ३५१४) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी घसरल्याने दीपक करोले ट्रकच्या चाकाखाली सापडले आणि गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, दीपक करोले हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, २ बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून करोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.