जळगाव मिरर । १९ ऑक्टोबर २०२५
इलेक्ट्रीक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग लागून दोन झेरॉक्स मशिन, लॅपटॉपसह दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातील मोहीते बिल्डींग परिसरात घडली. ऐन दिवाळीत दुकान जळून खाक झाल्यामुळे विक्रेता हवालदिल झाला होता. आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगरातील रहिवासी हेमंत अर्जुन चौधरी यांचे शहरातील स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रीकल, कटलरी, झेरॉक्सचे दुकान आहे. या ठिकाणी कलर व ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन झेरॉक्स मशिनसह दोन लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रीक फिटींगचे साहित्य, अन्य इलेक्ट्रीकल वस्तूंसह कटलरी साहित्यही ठेवलेले होते. तसेच चौधरी यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ लाखांचे आकाशकंदील, विक्रीसाठी ठेवले होते. शुक्रवारी रात्री चौधरी व त्यांच्या पत्नी दुकान बंद करून गेले. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर काही वेळातच दुकानातील सर्व साहित्यासह फर्निचर जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंत दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
दुकानाला आग लागल्यानंतर आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा व धुराचे लोट निघू लागले. इमारतीमध्ये धुर पसरल्याने रहिवाशांना श्वास घेणेही कठीण झाले होते. इमारतीमधील सर्व नागरिक इमारतीच्या खाली येवून पहाटेपर्यंत खालीच थांबून होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. आगी लागली त्या दिवशीच दुपारी वीज मीटर बदलविलेले होते. आग लागल्यानंतर रात्री पाऊण वाजता अग्नीशमन दलाला कॉल केला, मात्र सव्वा वाजता बंब घटनास्थळी दाखल झाले.