जळगाव मिरर । २० ऑक्टोबर २०२५
अमळनेर तालुक्यातील गडखांब रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला भरधाव जाणाऱ्या लक्झरीने धडक देऊन फरफटत नेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १८ रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील (वय २६) हा तरुण १८ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गडखांब येथून दहिवद फाट्याकडे दुचाकी क्रमांक एम एच १९ सी पी २९८७ वरून जात असताना चोपड्याकडून अमळनेरकडे जाणारी राजमुद्रा लक्झरी बसने (क्रमांक एमएच ०९ इएम ९०६३) भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली आणि मोटरसायकलसह ५० फूट फरफटत नेले. मागून येणारे तरुणाचे काका व इतरांनी ट्रॅव्हल्स थांबवली असता दिनेश हा दुचाकीसह बंपरच्या खाली अडकला होता. लोकांनी त्याला बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मयत तरुणाच्या काका विनोद भागवत पाटील दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत लक्झरी चालक चुनीलाल सुभाष बडगुजर (रा. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ विजय भोई हे करीत आहेत.