जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२५
सध्या दिवाळीचा सण सुरु असल्याने अनेक नागरिकांनी गेल्या दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र या मार्केट परिसरात दोन ठिकाणी पार्किगची व्यवस्था असल्यावर देखील जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या आवारात पार्किग मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांनी अवैध पार्किंग करून पोलीस स्थानकाला वेढा दिला आहे.
जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या महात्मा गांधी मार्केट व फुले मार्केट परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी जळगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याने शहर पोलीस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिक व अधिकारी, कर्मचारीना मोठी कसरत करावी लागत आहे.
मनपाचे दुर्लक्ष
शहरातील मनपा इमारतीपासून ते थेट शनीपेठ पर्यत मुख्य रस्त्यावर अनेक नागरिकांनी रस्त्याच्या आजूबाजूला व मधोमध दुचाकी, चारचाकी पार्किंग केल्याने या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना कशीबशी वाट काढावी लागत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील दिवाळीचा सण येणार होता. त्यामुळे नेहमी प्रमाणे या रस्त्यावर ट्राफिक जाम होत असल्याचे लक्षात येत असल्यावर देखील मनपाने आजवर यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही.
वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज
शहरातील मुख्य चौकात ग्रामीण भागासह शहरातील नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या पूर्वीच वाहतूक शाखेने या ठिकाणी योग्य ती उपाययोजना केली असती तर हि अवैध पार्किंग टाळता आली असती. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सणाच्या वेळी योग्य ती उपाय योजना करतील अशी अपेक्षा जळगावकर व्यक्त करीत आहे.