जळगाव मिरर । २१ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्याच्या राजकारणात एक दुःखद बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीवदादा देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. राजीव दादा देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले असून विकासकामांमध्ये त्यांचा पुढाकार उल्लेखनीय राहिला आहे. प्रामाणिक आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
दादांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत असून अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार चाळीसगाव येथे होणार असून यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.