जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या एका 38 वर्षीय तरुणाने एका विवाहित महिलेशी जवळीक वाढवून तिला ब्लॅकमेल केले आणि गेल्या अडीच वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील मैत्रीतून सुरू झालेले हे संबंध नंतर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणात बदलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची आणि आरोपीची ओळख फेसबुकवर झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत शारीरिक संबंधांचे व्हिडीओ आणि खाजगी फोटो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीचा अडीच वर्षे चाललेला शारीरिक आणि मानसिक छळ निमूटपणे सहन केला.
या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरात तसेच मुंबईतील विक्रोळीतील स्वतःच्या निवासस्थानी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सततच्या त्रासाला कंटाळून पीडिता तीव्र तणावाखाली होती. दीर्घकाळ चाललेल्या या छळानंतर अखेर पीडित महिलेने धैर्य एकवटत महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
