जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
शहरातील वाघ नगरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांना तालुका पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील एका घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या घरावर छापा टाकला असता, तिथे तीन महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाघ नगर परिसरात एकच खळबळ उडाली आणि अवैध कृत्यांविरुद्ध पोलिसांच्या धडक कारवाईची चर्चा सुरू झाली. या कारवाईमध्ये अॅन्टी ह्युमन ट्रैफिकिंग युनिट (एएचटीयू) विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला या पीडित आहेत का, त्यांना या व्यवसायात बळजबरीने आणले गेले होते का, या मानवी तस्करीच्या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोकों सचिन साळुंखे, अवेश शेख, अशोक फुसे तसेच एएचटीयू युनिटच्या योगिता नारखेडे, आणि मनिषा पाटील यांच्या पथकाने केली. या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.





















