जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२५
गेल्या काही दिवसापासून देशासह राज्यात मतचोरीच्या आरोपावरुन खळबळ उडाली आहे. यावरून सातत्याने विरोधकांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले आहेत. यातच आता मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नियोजन कसे असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
“निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा 1 नोव्हेंबर शनिवारी निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील,” असे अनिल परब यांनी सांगितले आहे.
“हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
“याबाबत पोलिसांना भेटलो असून सूचना घेतल्या आहेत. या मोर्चाचे रुट प्रसिद्ध केले आहेत. उद्या क्यूआर कोड पाठवू. म्हणजे लोकांची व्यवस्था होईल. मुंबईवरून येणाऱ्या दोन लोकांची वाहन व्यवस्था राहील. मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील,” असं अनिल परब म्हणाले. शरद पवार देखील मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितलं.
“आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चोक्कलिंगम यांनी जे सांगितलं त्यावरही अभ्यास करत आहोत. आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे. चोर चोऱ्या करणार आणि आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला. पण रोहित पवार घाबरणारे नाहीत, ते बिनधास्त लढत आहेत. हा गांधी- नेहरूंचा देश आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. MahaVikas Aghadi Morcha |

 
			

















