हैदराबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी आपल्या पत्नीने केलेला ३० वर्ष जुना नवस फेडण्यासाठी शिर्डीच्या साईबाबांना नुकताच ४० लाख रुपये किंमतीचा आणि ७४२ ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आला आहे.
कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये भक्तांसाठी साई मंदिर खुले करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेकजण आपल्या इच्छा, नवस पूर्ण करण्यासाठी शिर्डीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या 7 महिन्यात साईंच्या दानपेटीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त दान जमा झाले आहे. तर 64 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.
शिर्डीला येणाऱ्या भाविकांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश आणि विदेशातूनही भाविक येत असतात. आज दुपारच्या आरती दरम्यान हैदराबाद येथील डॉ रामकृष्ण मांबा आणि रत्ना मांबा यांनी सहकुटुंब हजेरी लावून श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. 1992 मध्ये त्यांनी साईबाबांना नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठी त्यांनी सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा 742 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केलाय.
गुरुपौर्णिमेला साईचरणी कोट्यावधींच दान
गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी एकूण 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दानपेटीत 2 कोटी 17 लाख, देणगी काऊंटरवर 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन 1 कोटी 36 लाख, 12 देशांमधून 19 लाखांचे परकीय चलन, 22 लाख 14 हजारांचे 479 ग्रॅम सोने आणि 3 लाख 22 हजार रुपये किमतीची 6 किलो 800 ग्रॅम चांदी यांचा समावेश आहे




















