जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसले आहेत. मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदानाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी मुंबईत आयोजित ‘सत्याचा मोर्चा’त थेट राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला. या मोर्चात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, विशेषतः उद्धव ठाकरे, देखील सहभागी झाले होते. दोन्ही ठाकरे बंधूंनी एका मंचावरून मतदार याद्यांवरील गोंधळाविरोधात आवाज उठवून, आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय चित्रात खळबळ उडवली आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत “काम करा नाहीतर पद सोडा!” असा कडक इशारा दिला. “इतक्या दिवसात काय काम केलं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चेतावणी देत म्हटले की, “केवळ पद भूषवून चालणार नाही, पक्षासाठी सक्रिय काम करा, अन्यथा कारवाईस तयार रहा.”
राज ठाकरे यांनी बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले असून, आगामी नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात मनसेसाठी सध्या पोषक वातावरण नसल्याचे मान्य करतानाही, त्यांनी “परिस्थिती बदलायची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे” असे सांगितले.
दरम्यान, मुंबईतील मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. “आम्ही दोघं एकत्र आलो तर बदल घडवून आणू”, अशा संकेतांनी दोन्ही नेत्यांनी राज्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे.



















