जळगाव मिरर | ८ नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून, या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी नागरिकांनी आशा व पुरुष स्वयंसेवकांना सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.
या मोहिमेद्वारे मज्जासंस्थेतील निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना त्वरित बहुविध औषधोपचार उपलब्ध करून देणे, नवीन संक्रमित रुग्ण ओळखणे व संक्रमणाची साखळी खंडित करणे, तसेच कुष्ठरोगाविषयी जनजागृती करून समाजातील गैरसमज आणि बदनामी दूर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या बैठकीस सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. इरफान तडवी, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेसाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या असून, प्रशिक्षण, प्रसिद्धी, साहित्य व औषधोपचार पुरवठा, सूक्ष्मदर्शी आराखडा आदींचा आढावा घेण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी डॉ. हारकर यांनी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून मोहिमेचे समन्वयन व पर्यवेक्षण प्रभावीपणे पार पाडावे, तसेच प्रत्येक स्तरावर बैठकांचे अहवाल सादर करावेत, असे निर्देश दिले. यावेळी डॉ. तडवी यांनी मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देत, सांगितले की, 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणारे हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. बैठकीला, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



















