जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५
गेली काही दिवसापासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव मोठ्या चर्चेत आले आहे. मुंढवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांमार्फत अभ्यास करणे आवश्यक असते, मात्र मुंढवा प्रकरणात तसे काहीही झाले नाही. या व्यवहाराची मला कोणतीही माहिती नव्हती, अन्यथा मी हे होऊ दिले नसते, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंढव्याच्या जमीन प्रकरणाबाबत पार्थने मला कल्पना दिली नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून ते पार्थ यांना भेटले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याशी बोलेन. कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करूनच असे व्यवहार करायचे. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल.
अजित पवार म्हणाले की, मी नियमाने काम करणारा कार्यकर्ता आहे. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाही, मात्र माझी बदनामी झाली. माझ्या कुणी कितीही जवळचा किंवा नातेवाईक असो, कुणाचेही काम नियमाच्या बाहेर जाऊन करू नका.
अजित पवार म्हणाले की, मुंढवा आणि बोपोडी दोन्ही प्रकरणांमध्ये जमीन शासनाची असल्याने हे व्यवहार नोंदणी अधिकाऱ्यांनी थांबवणे गरजेचे होते, मात्र ते थांबले नाहीत. एका रुपयाचाही व्यवहार झालेला नाही, तरीही खरेदीखत झाले, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या तीन लोकांवर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. ही समिती भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करेल.



















