जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२५
अवैध धंदे चालकांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली. जळगाव उपविभागातील जिल्हापेठ, एमआयडीसी व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये शांतता भंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी अवैध दारुंच्या अड्डायावर गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर काम करीत आहे. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यातील अंमलदारांसह क्युआरटी व आरसपीच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत एमआयडीसी, जिल्हापेठ, शनिपेठ, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये शांतता भंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
या ऑपरेशनमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा येथील ७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचनरगर, विठ्ठलपेठ, डॉ. आंबेडकरनगर, गोपाळपुरा, कोळीपेठ, मेस्कोमाता नगर, गुरुनानक नगर, शनिपेठ, गवळीवाडा, दाळफळ, तळेले कॉलनी, शंकर आप्पा नगर याठिकाणावरील १४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक तर ४ जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ऑपरेशनमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहूनगर या भागात कारवाई केली. तसेच एस. के ऑईल मिल समोरील भिंतीलगत संशयित देशी दारुची अवैधरित्या विक्री करीत होता. त्याच्यावर कारवाई करुन ५६० रुपयांची दारु जप्त केली. तर दूध फेडरेशनजवळील मिथीला अपार्टमेंटमधील विकास बियर शॉपीमध्ये विनापरवाना देशी दारुची विक्री करणाऱ्यावर पथकाने छापा टाकला. त्याच्याकडून १६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनांना अवैध धंद्याची किनार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य जळगावकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी पोलीस दलाकडून कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली असून ही मोहीम यापुढे देखील सुरु राहणार आहे




















