जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२५
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज (15 नोव्हेंबर 2025) नागपूरमध्ये राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य स्पर्धा, लघुचित्रपट आणि डॉक्युमेंट्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार उपस्थित होते.
राज्यस्तरावरील लघुचित्रपट स्पर्धेत खान्देशातील कलावंतांनी जोरदार बाजी मारली. ‘आदिवासी आणि निसर्ग’ या लघुचित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 300 हून अधिक लघुपटांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे खान्देशाचा राज्यभर नावलौकिक झाला आहे.
या लघुपटाचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका प्रदीप चुडामन भोई यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबत महिला मुख्य भूमिकेत पत्रकाराची भूमिका शीतल नितीन नेवे यांनी प्रभावीरीत्या निभावली आहे. तसेच सचिन सोनवणे आणि चिंचपाडा गावातील काही आदिवासी कलावंतांनीही भूमिका साकारून लघुपटाला वास्तववादी रंग दिला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण चोपडा तालुक्यातील चिंचपाडा गाव आणि सातपुडा पर्वत श्रेणीमध्ये करण्यात आले. चित्रीकरण आणि संकलनाची जबाबदारी दीप्तेश सोनवणे यांनी सांभाळली. विविध आदिवासी घटक, संस्कृती आणि निसर्गाची सांगड घालणारा हा लघुपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. राज्यस्तरीय मंचावर खान्देशातील कलावंतांनी मिळवलेला हा मान साजरा होत असताना, आदिवासी संस्कृती जपणाऱ्या कलावंतांचे कौतुक सर्वत्र होत आहे.



















