जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२५
सौदी अरेबियात उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात होऊन तब्बल 42 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 लहान मुले असल्याचे अधिकृत माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे हैदराबाद व परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, यात्रेकरूंची बस एका डिझेल टँकरला जोरदार धडकली, ज्यामुळे काही क्षणांतच बसने पेट घेतला. अपघात इतका अचानक झाला की बहुतेक प्रवासी झोपेत होते आणि जिवंत बाहेर पडण्याची त्यांच्यातील शक्यता अत्यंत कमी होती. प्राथमिक अहवालात सर्व मृत भारतीय असून बहुसंख्यजण हैदराबादचे रहिवासी असल्याचे नमूद केले आहे.
ही घटना मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ, भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 वाजता घडली. आग लागण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण झाले. घटनेनंतर तेलंगणा सरकारने रियाधमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पीडितांची ओळख पटविण्याचे व सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सींशी संपर्क साधून प्रवाशांची माहिती रियाधमधील भारतीय दूतावासाला पाठविल्याचे सांगितले. ओवैसी यांनी भारतीय दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन अबू मथान जॉर्ज यांच्याशीही चर्चा केली असून स्थानिक अधिकाऱ्यांकडून तपशील गोळा केले जात असल्याचे त्यांनी कळवले. या भीषण अपघातानंतर राज्य आणि देशभरातून दु:खाची लाट व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी दोन्ही देशांतील यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.




















