जळगाव मिरर । १७ नोव्हेंबर २०२५
बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्यासंबंधी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला आहे. काँग्रेस हा भारताच्या डीएनएतून तयार झालेला व कसलेला विचार आहे. हा विचार चंद्र – सूर्य असेपर्यंत कायम राहील. त्यामळुळे काँग्रेसला संपवणारा अजून कुणीही जन्माला आला नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे व सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी त्याचाही समाचार घेतला काँग्रेसला संपवणारा अजून कुणीही जन्माला आला नाही. काँग्रेस हा भारताच्या डीएनएतून तयार झालेला व कसलेला विचार आहे. हा विचार चंद्र – सूर्य असेपर्यंत कायम राहील, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग होता. त्यात 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. पण त्यात कुठेही सुरक्षेचा विचार केला गेला नाही. त्यामुळे हा महामार्ग सदोष आहे, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी शताब्दी हॉस्पिटलच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात अनेक घोटाळे सुरू झालेत. एकेक करून त्याचा पर्दाफाश होणार आहे. सत्ताधारी पक्षांकडून सरकारी जमिनी व वादग्रस्त जमिनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. यात भाजप मोठा चॅम्पियन पक्ष आहे. सरकारने याची श्वेतपत्रिका काढावी. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक दिवस चर्चा केली जावी.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तर धनंजय मुंडे यांनी हा आरोप धुडकावून लावत आपल्यासह जरांगेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. या दोघांतील आरोप प्रत्यारोपामुळे मराठवाड्याचे विशेषतः बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे मराठा व ओबीसी समाजात वितुष्टही निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे.
ते म्हणाले, धनंजय मुंडे व मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादात कुणी मुख्य आरोपी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मराठा आंदोलक आंतरवाली सराटीत आंदोलन करत होते, तेव्हा त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक विण उद्ध्वस्त झाली. आंतरवाली सराटीच्या निमित्ताने फडणवीसांनी एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात व एका प्रवर्गाला दुसऱ्या प्रवर्गाविरोधात उभे केले. यामुळे महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले. त्यामुळे या प्रकणी कुणाची नार्को टेस्ट करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांची झाली पाहिजे. फडणवीसांनी महाराष्ट्राचा खेळखंडोबा कसा केला, जातीपातीत कशी भांडणे लावली, कुणाच्या खिशात सरकारी जमिनी टाकल्या, याची चौकशी त्या नार्को टेस्टमध्ये झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.





















