जळगाव मिरर । १८ नोव्हेंबर २०२५
गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा व साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने दि. १४ नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली. यात खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी, कांताई बंधारा परिसरात प्रशासनाने धाड टाकत मोठ्या वाळू साठा जप्त केला. त्यांच्या पंचनामा करण्यात आला असून, तो साठा २३०० ब्रास आला आहे. याप्रकरणात धानोऱ्यांचे पोलिस पाटील, तलाठी व सर्कल यांना निलंबीत करण्यात आले असून, जळगाव तहसीलदार शीतल राजपूत व प्रांतधिकारी विनय गोसावी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अवैध वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या पथकाने कारवाई केली होती. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वाळू उपशाच्या तक्रारी, नदीपात्राचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन ही मोहिम राबवण्यात आली. अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अचानक कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या संपूर्ण वाळू साठ्याचा पंचनामा गौण खनिज विभागाने केला आहे.
साठा विखुरलेल्या प्रमाणात असल्यामुळे उशिर लागला. जप्त केलेली वाळू २३०० ब्रास असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सध्या हा अवैध साठा पोलिस बंदोबस्तात गिरणा काठावर असून, त्या साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी कारवाया होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.




















