जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२५
राज्याच्या राजकारणात सध्या नगरपरीषद निवडणुकीची धामधूम सुरु असून आता सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीनंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोंडाईचा येथे भाजप नेत्या आणि राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणार असल्याचे अधिकृतपणे निश्चित झाले आहे. कारण, महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आला. याचबरोबर दोंडाईचा नगरपरिषदेसाठी भाजपचे सात उमेदवारही कोणतीही स्पर्धा न राहता बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे दोंडाई नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या ताब्यात जाणार हे निश्चित झाले आहे.
दोंडाईचा नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी नयन कुवर रावल यांच्या नावाने दाखल करण्यात आली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शरयू भावसार यांनी उमेदवारी दाखल केल्याने दोन्ही गटात थेट सामना अपेक्षित होता. मात्र छाननी दरम्यान शरयू भावसार यांचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी याबाबत माहिती देत, अर्जातील तांत्रिक कारणास्तव तो ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड जवळपास आपोआप निश्चित झाली आणि भाजपला आणखी एक मोठे यश मिळाले.
मात्र या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त करत शरयू भावसार यांनी न्यायालयाचा मार्ग धरला आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. अर्ज अवैध ठरण्यासाठी देण्यात आलेले कारण स्वीकारार्ह नसून तांत्रिक कारणे दाखवून निवडणुकीतून दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भावसार कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवताना शरयू भावसार यांच्या कुटुंबातील घरपट्टीची थकबाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हीच बाब छाननीवेळी अर्ज बाद होण्याचे महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसते.
दोंडाईतील परिस्थिती जशी आहे, तशीच सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीतही पाहायला मिळाली. तेथे प्रथमच 60 वर्षांनंतर निवडणूक होणार असे दिसत होते. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र छाननी प्रक्रियेत उज्ज्वला थिटे यांचा अर्जही अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवड होऊन भाजपच्या उमेदवाराचा मार्ग सुकर झाला. सलग दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद झाल्यानंतर दोन्ही निवडणुका बिनविरोध होणे ही राज्यातील राजकीय चर्चेची नवी दिशा ठरत आहे.
दोंडाई आणि अनगर या दोन्ही ठिकाणी झालेल्या घडामोडींमुळे बिनविरोध निवडणुकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धा असताना ती छाननी प्रक्रियेत थांबणे, विरोधी उमेदवारांचे अर्ज विविध तांत्रिक कारणांनी बाद ठरणे, त्यावर न्यायालयीन लढाई उभी राहणे, या सर्व घटनांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोंडाईतील परिस्थिती पाहता, नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणात जाणार आहे, आणि याचा परिणाम पुढील नगरविकास आणि सत्तेच्या समीकरणांवर होणार आहे. आता शरयू भावसार यांच्या न्यायालयीन लढाईला काय निकाल लागतो आणि त्याचा निवडणूक प्रक्रियेवर पुढे काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















