जळगाव मिरर | संदीप महाले
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवार्इकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रसूतीसाठी येथे दाखल होणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणावर मानसिक, शारिरीक त्रास होत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असून सर्वसामान्य रुग्णांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्ह्याभरातील ग्रामीण भागातून येथे मोठ्या प्रमाणावर प्रसूतीच्या महिला दाखल होत असतात मात्र दुसऱ्या मजल्यावरील प्रसूती पूर्व तपासणी विभाग 216 नंबरला असून तेथे जाण्यासाठी तयार केलेली लिफ्ट गेल्या सहा महिन्यांपासून बंदावस्थेत असल्याने महिलांना जिन्यावरून पायपीट करावी लागत आहे. या विभागात गरोदर महिलेची 1 ते 9 महिन्याची तपासणी होते त्यानंतर जर 9 व्या महिन्यात महिलेच्या पोटात कळ येत असल्यास ऍडमिट केले जाते.
पहिल्या मजल्यावरील 123 येथे सोनोग्राफी करण्यात येते. जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी मुख्य आधारवड आहे. विशेषत: ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची तपासणी आणि प्रसूतीसाठी हेच रुग्णालय आशेच्या ‘किरण’ आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयातील मूलभूत सुविधांची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कामकाजातील उदासीनता यामुळे गरोदर महिलांच्या यातना प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये संतापाची लाट उसळली असून, आशेचा ‘किरण’ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
सहा महिन्यांपासून लिफ्ट बंद
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर कक्ष क्रमांक 216 वर ‘प्रसूतीपूर्व तपासणी विभाग’ कार्यरत आहे. या विभागात 1 ते 9 महिन्यांपर्यंतच्या गर्भवतींची नियमित तपासणी केली जाते. 9 वा महिना सुरू झालेल्या आणि प्रसूतीची वेदना सुरू झालेल्या महिलांना येथूनच ऍडमिट केले जाते. या सर्व प्रक्रियेत दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेली लिफ्ट ही एक महत्त्वाची सुविधा आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ही लिफ्ट बंद असून, तिच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
परिणामी, गर्भवती महिलांना तब्बल 23 पायऱ्या चढून तपासणी विभागात जावे लागते, तर ऍडमिट होण्यासाठी त्यांना आणखी 25 पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावरून पुढे जावे लागते. हे सर्व करताना त्यांच्या शारिरीक व मानसिक त्रासात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. विशेषत: पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. प्रसूती जवळ आल्यामुळे काही महिलांना चालणेही कठीण होत असताना त्यांना एवढ्या पायऱ्या चढणे ही अक्षरश: ‘कसरत’ बनली आहे. वेदनेत ओरडणाऱ्या, कळा सुरू झालेल्या महिलांना वरच्या मजल्यावर नेण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या नातेवाईकांचीही अक्षरश: दमछाक होत आहे.
‘पहिला… दुसरा…पहिला’ गोलमाल
पहिल्या मजल्यावरील 123 क्रमांकाच्या कक्षात सोनोग्राफी केली जाते. तपासणी विभाग दुसऱ्या मजल्यावर असल्याने गर्भवती महिलांना प्रथम दुसऱ्या मजल्यावर तपासणीसाठी, नंतर पुन्हा पहिल्या मजल्यावर सोनोग्राफीसाठी आणि पुन्हा दुसऱ्या मजल्यावर अहवाल घेण्यासाठी चढउतार करावे लागत आहेत. यामुळे गर्भवती महिलांच्या पायपीटीत प्रचंड वाढ झाली असून, त्यांच्या तब्येतीसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. काही महिलांना तर दोन मजले चढल्यानंतर अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास आणि चक्कर येण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
प्रशासनाचे तोंडावर बोट, डोळ्यावर पट्टी
गर्भवती महिलांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही त्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होतांना दिसत नाही. काही कर्मचारी तर महिलांना तुच्छ वागणूक देत असल्याने संताप वाढला आहे. जिल्हा शल्सचिचकित्सक यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणे क्रमप्राप्त असतांना ते मात्र ‘दालना’च्या बाहेर येण्यास तयार नाही.




















