जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, जामनेर नगरपरिषदेने भाजपच्या खात्यात मोठा विजय जमा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, जामनेरमध्ये भाजपचा विजयाचा गुलाल अगोदरच उधळला आहे.
यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर या पदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. साधना महाजन या यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा राहिल्याने त्यांचा अनुभव, लोकप्रियता आणि महाजन कुटुंबाची मजबूत संघटनशक्ती लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला.
राजकीय रंग मिळत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटानेही उमेदवार उभे केले होते. मात्र आज (२० नोव्हेंबर) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी साधना महाजन यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. या विजयामुळे जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी नगरपालिका ठरली आहे. यासोबतच उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील आणि नानाभाऊ बाविस्कर असे पाच उमेदवारही आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत भाजपने आघाडी घेत 27 पैकी 5 जागा बिनविरोध मिळवून महाजन कुटुंबाने पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.





















